
नांदेड, 18 मार्च (हिं.स.)।
बालसाहित्य आणि गीतलेखनाकडे
आपल्याकडे नेहमीच नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. अनेक जण बालसाहित्य लिहायला घाबरतात, कारण यामुळे आपल्यावर 'बालसाहित्यिक' म्हणून शिक्कामोर्तब होईल, अशी भीती त्यांच्या मनात असते. यामुळेच बालसाहित्याकडे अपेक्षित गांभीर्यान पाहिले जात नाही. ही परिस्थिती प्राथमिक शिक्षणासारखी आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून फक्त उच्च शिक्षणाचा जयघोष केला जातो, पण पाया कच्चा राहतो. उद्याचे चांगले मराठी वाचक घडवायचे असतील, तर आज उत्तम बालसाहित्याची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत प्रख्यात कवी-गीतकार दासू वैद्य यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलाच्या वतीने आयोजित कौशल्य विकास उपक्रमांतर्गत डॉ. पी. विठ्ठल यांनी त्यांच्या सोबत केलेल्या संवादात वैद्य यांनी साहित्यिक प्रवासावर प्रकाश टाकला. माझ्या लेखनावर मुदखेड, अंबाजोगाई आणि नांदेड या भागातील सांस्कृतिक व शैक्षणिक वातावरणाचा मोठा प्रभाव आहे. मला कवी म्हणून ओळखले जाणे अधिक आवडते, असे त्यांनी सांगितले. युद्धांबद्दल चिंता व्यक्त करत ते म्हणाले, हे राजकारण माणसाला मागे नेणारे असून, सर्वसामान्य माणूस केवळ उदरनिर्वाहासाठी झटत असतो. त्याचे जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत. यावेळी डॉ. शत्रुघ्न जाधव, डॉ. नीना गोगटे, विनायक येवले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis