
पुणे, 18 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या *समूह साधन समन्वयक (केंद्रप्रमुख)* भरती परीक्षेत पात्र ठरलेल्या शिक्षक उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारांना आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असल्याची माहिती अनिवार्यपणे सादर करावी लागणार आहे.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले की, संबंधित उमेदवारांनी 21 मार्चपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही माहिती भरावी. ई-मेल, पत्र किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेली माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच, या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही भरती प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील कार्यरत शिक्षकांसाठी राबविण्यात आली होती. ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025’ ही परीक्षा 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी तीन सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
या परीक्षेचा निकाल 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आला असून, पात्र उमेदवारांना केंद्रप्रमुख पदासाठी नियुक्ती मिळवण्यासाठी TET किंवा CTET उत्तीर्ण असल्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.
तसेच, गुणपडताळणीसाठी इच्छुक उमेदवार 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु