
अमरावती, १८ मार्च (हिं.स.) : वरुड तालुक्यात संत्रा तोडणीच्या हंगामात मजुरांची मालवाहू वाहनांतून अवैध आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे समोर आले आहे. पीकअप, टाटा एस, आयशर तसेच ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मजूर कोंबून नेले जात असून वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे मजुरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सध्या मृगबहारातील संत्र्यांची तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, स्थानिक खेड्यांबरोबरच बाहेरील भागांतूनही मजूर आणले जात आहेत. मात्र, या मजुरांना शेतांपर्यंत पोहोचवताना वाहनांमध्ये नियमबाह्य गर्दी केली जात आहे. अनेक मजूर वाहनांच्या बफरवर, साइडला उभे राहून किंवा टपावर बसून प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, १६ मार्च रोजी इसंब्री येथील मजुरांना नागपूर जिल्ह्यातील मोवाड परिसरात नेत असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे २० ते २५ मजूर गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील पोलिस प्रशासन या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास आणखी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.
त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून अवैध व धोकादायक मजूर वाहतुकीवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी