
नवी दिल्ली , 18 मार्च (हिं.स.)।इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धानंतर निर्माण झालेल्या तेल संकटाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. अशा परिस्थितीत भारताची ताकद जगासमोर ठळकपणे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी होर्मुज सामुद्रधुनीतून भारताचे दोन जहाज सुरक्षितपणे गॅस घेऊन गुजरातमधील बंदरांवर पोहोचले होते. आता भारताने आणखी एक महत्त्वाचा डाव खेळला आहे.दक्षिण चीन समुद्रात रशियन तेलाने भरलेला एक टँकर अचानक वळल्याची माहिती समोर आली आहे. हा टँकर मूळतः चीनमधील रिजाओ बंदराच्या दिशेने जात होता; मात्र आता तो वेगाने भारताच्या दिशेने येत आहे.
सध्याच्या परिस्थितीत भारताने रशियाकडून तेल आयात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतून तेल पुरवठा खंडित झाल्यानंतर भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
‘आक्वा टायटन’ नावाचा हा आफ्रामॅक्स टँकर जानेवारीच्या अखेरीस बाल्टिक समुद्रातील एका बंदरातून ‘युराल्स क्रूड ऑइल’ घेऊन रवाना झाला होता. सुरुवातीला त्याचे गंतव्य चीनमधील रिजाओ बंदर होते. मात्र मार्चच्या मध्यात तो दक्षिण-पूर्व आशियाई समुद्रक्षेत्रात पोहोचताच त्याने यू-टर्न घेतला. आता हा टँकर २१ मार्च रोजी न्यू मंगळूर बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे.
जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी तात्पुरती वाढवण्याची सवलत दिल्यानंतर काही दिवसांतच हा बदल झाला. यापूर्वी भारताने रशियन तेल खरेदी कमी केली होती, त्यामुळे अनेक कार्गो चीनकडे वळले होते. मात्र आता परिस्थिती बदललेली दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode