
नवी दिल्ली , 18 मार्च (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवैतचे युवराज शेख सबाह अल-खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ईदच्या निमित्ताने आगाऊ हार्दिक शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर आपले विचार मांडले तसेच अलीकडील घडामोडींवर गंभीर चिंता व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील बदललेल्या परिस्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली आणि अलीकडील घटनांबाबत चिंता व्यक्त केली. कुवैतच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवरील हल्ल्यांचा आम्ही तीव्र निषेध पुन्हा व्यक्त केला. होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड जहाजवाहतूक सुनिश्चित करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी सातत्यपूर्ण राजनैतिक संवाद आवश्यक असल्याबाबत दोन्ही देश सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी कुवैतमधील भारतीय समुदायाच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल युवराजांचे आभार मानले. कुवैतमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास असून त्यांच्या हितांचे संरक्षण करणे भारतासाठी नेहमीच अत्यंत महत्त्वाचा विषय राहिला आहे.
यापूर्वी, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल-नहयान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली होती. यावेळी पंतप्रधानांनी यूएईवरील हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला होता. या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
दोन्ही नेत्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत सुरक्षित आणि मुक्त नौवहन सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर सहमती दर्शवली तसेच प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल-नहयान यांच्याशी संवाद साधून त्यांना ईदच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली. तसेच यूएईवरील हल्ल्यांचा कठोर निषेध नोंदवत निरपराध नागरिकांच्या मृत्यूबद्दल आणि नागरी संरचनेच्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode