
मुंबई, 18 मार्च, (हिं.स.) : गुलजार ए रजा या संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर बाबी समोर आल्याने या प्रकरणाची एटीएसमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची मर्यादा केवळ धार्मिक कारणासाठी निधी जमा करण्यात आला एवढ्यावरच नसून तपासादरम्यान परदेशातील संस्थेकडून सुमारे २५ लाखांची रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेची सर्व बँक खाती सील करण्यात आली असून आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे १८,५७३ देणगीदारांकडून चार जिल्ह्यांतील ४०० ड्रॉप बॉक्सद्वारे निधी जमा करण्यात आला असून सर्व देणगीदारांची माहिती उपलब्ध नसल्याने त्याची सखोल पडताळणी सुरू आहे. विविध खात्यांमधून रक्कम काढून इतरत्र वळवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. निधीचा वापर कोणत्या कारणांसाठी करण्यात आला, तसेच त्यामागील उद्देश काय होता, याची चौकशी केली जात आहे.
या प्रकरणातील प्रत्येक पैलू स्पष्ट करण्यासाठी एटीएसकडून समांतर तपास सुरू असून, आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, संबंधित संस्थेच्या नावाखाली विविध कारणे सांगून नागरिकांकडून सुमारे ४.७३ कोटींची रक्कम जमा करण्यात आली. ट्रस्ट माजलगाव येथे स्थापन करण्यात आला असला तरी बँक खाते लातूर येथील अॅक्सिस बँकेत उघडण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे. ट्रस्टमार्फत आणखी कोणते गैरप्रकार झाले आहेत का, याची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर