सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू
नवी दिल्ली , 18 मार्च (हिं.स.)।अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक गडद होत आहे. दरम्यान, भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाने आता रेड सी मार्गे भारताला कच्च्या तेलाचा
होर्मुज संकटात सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू


नवी दिल्ली , 18 मार्च (हिं.स.)।अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक गडद होत आहे. दरम्यान, भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाने आता रेड सी मार्गे भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू केला आहे. सौदी अरेबियातील यानबू बंदर येथून अनेक तेलवाहू टँकर भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.

होर्मुज मार्गाने जहाजांची वाहतूक धोकादायक बनलेल्या परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अहवालानुसार, सध्या चार मोठे टँकर भारताकडे येत असून त्यामध्ये सुमारे ६० लाख बॅरल कच्चे तेल आहे. महिन्याच्या अखेरीपर्यंत अतिरिक्त ९० लाख ते १ कोटी बॅरल तेल भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे.सामान्यतः जगातील एकूण तेल व्यापारापैकी सुमारे २० टक्के तेल वाहतूक स्ट्रेट ऑफ होर्मुजमार्गे होते. भारतही खाडी देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल याच मार्गाने आयात करतो. मात्र, इराणकडून जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे हा मार्ग असुरक्षित झाला आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने पर्यायी मार्गाचा अवलंब केला आहे.

तेल प्रथम सुमारे १,२०० किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे यानबूपर्यंत आणले जाते आणि त्यानंतर तेथून टँकरद्वारे भारताकडे पाठवले जाते. मात्र, या नव्या मार्गालाही काही मर्यादा आहेत. पाइपलाइनची क्षमता मर्यादित असल्यामुळे होर्मुज मार्गाइतका तेलपुरवठा करणे शक्य नाही.

इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यतिरिक्त बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीजवळ देखील धोका कायम आहे. येथे हूती बंडखोरांनी यापूर्वी जहाजांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे रेड सी मार्गही पूर्णपणे सुरक्षित मानला जात नाही. तरीही सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय भारतासाठी दिलासादायक ठरत आहे, कारण त्यामुळे तेलपुरवठा सुरू राहून संभाव्य ऊर्जा संकट कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मंगळवार (१७ मार्च २०२६) रोजी अमेरिकेने स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात इराणच्या अँटी-शिप क्षेपणास्त्र तळांवर बॉम्बहल्ला केला आहे. या कारवाईद्वारे स्ट्रेट ऑफ होर्मुजवरील इराणचे नियंत्रण कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande