
प्रहार संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
लातूर, 18 मार्च (हिं.स.) । उदगीर तालुक्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस सिलेंडर बुकिंग करूनही ८ ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. विशेषतः महिला वर्गात यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार तथा तालुका पुरवठा अधिकारी, उदगीर यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या मते, हॉटेल व मंगल कार्यालयांसारख्या व्यावसायिक ठिकाणी गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत असताना घरगुती ग्राहकांना मात्र वेळेवर पुरवठा होत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.प्रहार जनशक्ती पक्षाने तालुक्यातील गॅस एजन्सींवर चौकशी करून नागरिकांना तात्काळ गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, तसेच जनतेची गैरसोय करणाऱ्या संबंधित एजन्सींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis