
सोलापूर, 18 मार्च, (हिं.स.)इराक-इराण युद्धामुळे एलपीजी, सीएनजी मिळत नाही, भाव वाढले आहेत, गॅस भरायला तास्नतास रांगेत उभारावे लागते, अशी कारणे पुढे करीत रिक्षा चालकांनी तिकीट दर वाढविला आहे. त्यानुसार आता प्रवाशांना रिक्षातून प्रवास करताना छोट्या टप्प्यासाठी ५ ते १० रुपये आणि लांबच्या प्रवासासाठी १५ रुपये ज्यादा मोजावे लागत आहेत.
सोलापूर शहरात ‘आरटीओ’कडील नोंदीनुसार १७ हजारापर्यंत रिक्षा आहेत, पण प्रत्यक्षात शहरातून ३० हजारांवर रिक्षा धावतात.मंगळवेढा रोड, अक्कलकोट रोड, ७० फूट रोड या मार्गावर भाडेवाढ केली, पण त्याठिकाणी प्रवाशांची कोणतीही अडचण नसल्याचे रिक्षा चालक सांगतात. पण, होटगी रोड, विजयपूर रोड या मार्गावरील प्रवासी वाद घालत असल्याचेही चालकांनी सांगितले. रेल्वे स्टेशन ते स्टॅण्ड आणि स्टॅण्डपासून रेल्वे स्टेशनपर्यंत यायला आता प्रवाशांना ३० रुपये द्यावे लागत आहेत. १५ दिवसांपूर्वी हा दर १५ ते २० रुपये होता. प्रवाशांना रिक्षा भाड्याने करायची असल्यास ३० ते ५० रुपये आता ज्यादा द्यावे लागत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड