
सोलापूर, 18 मार्च, (हिं.स.) - सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उप अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया घेण्यात येत असून अध्यक्ष पदासाठी बार्शीचे दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष पदासाठी उत्तर तालुक्याचे इंद्रजीत पवार यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अध्यक्षांनी उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासोबत जिल्हा परिषद बालाजी नरोटे, नेताजी खंडागळे आणि विकास बुळा यांनी अर्ज नेले होते. त्यानंतर बालाजी सरोवर या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 38 सदस्यांची बैठक होऊन त्या ठिकाणी विकास वैद्य अध्यक्ष पद आणि इंद्रजीत पवार उपाध्यक्ष पदासाठी नावे निश्चित करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, गटनेत्या रश्मी बागल, जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार, पृथ्वीराज माने, नेताजी खंडागळे यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष पदासाठी इंद्रजीत पवार यांचे उमेदवारी अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष देशमुख यांच्याकडे दाखल झाले आहेत.
दरम्यान जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड ही प्रत्येकी सव्वा सव्वा वर्ष आहे. त्यानंतर इतर सदस्याला संधी मिळेल आणि हे या सदस्यांनी मान्य केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड