
बीड, 18 मार्च (हिं.स.)।
हिंदू नववर्षाची सुरुवात मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत साखर गाठींची विक्री सुरू झाली असली, तरी यंदा महागाईमुळे साखर गाठींचा गोडवा महाग झाल्याचे चित्र दिसून येत ग्राहकांनी खरेदीकडे काही प्रमाणात पाठ फिरवली असून, परंपरेचा मान राखण्यासाठीच अनेक जण एक-दोन हार खरेदी करत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
राज्यभर महागाईत मोठी वाढ झाली आहे. वाढलेल्या किमतींचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यांवर झाला असून सण-उत्सव साजरे करणेही अनेकांसाठी खर्चिक ठरत आहे. अशा परिस्थितीत गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखर गाठींच्या हारांच्या किमतीत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या पारंपरिक वस्तूंच्या खरेदीवरही परिणाम होत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी घरासमोर गुढी उभारून त्यावर कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखर गाठींचा हार घालून विधीवत पूजा केली जाते. विशेषतः ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी, घरात समृद्धी नांदावी, या श्रद्धेने गुढी उभारली जाते. साखर गाठींचा हार हा गुढीचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे गुढीपाडव्याच्या काही दिवस आधीच शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये तसेच चौकाचौकांत विक्रेत्यांनी स्टॉल उभारले आहेत. विविध आकारांचे आणि सजावटीचे साखर गाठींचे हार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र गतवर्षी सुमारे ८० रुपये किलो दराने मिळणाऱ्या साखर गाठींचे दर यंदा १०० रुपयांपेक्षा अधिक झाले आहेत. त्याचप्रमाणे गुढीसाठी वापरला जाणारा खोबऱ्याचा हार सुमारे २५० रुपये किलो दराने विकला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis