
पुणे, 18 मार्च (हिं.स.) : उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात ४६ हजार ०६८ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी २०२४-२५ च्या फेब्रुवारी महिन्यात ३९ हजार ४८८ टँकर सुरू होते. तर २०२३-२४ वर्षात फेब्रवारी महिन्यात ३३ हजार ९५१ टँकर सुरू होते.टँकर भरण्यासाठी महापालिकेने पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रुंगी, पद्मावती आणि पटवर्धन बाग या सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. या ठिकाणांहून महापालिकेच्या मालकीचे तसेच ठेकेदारांचे टँकर नागरिकांना पाणीपुरवठा करतात. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने आतापासूनच टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात ४२ हजार ५४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या वाढून ४६ हजार ६८ टँकरवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये ३९ हजार ४८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.शहराचा उपनगरांचा भाग असलेल्या धनकवडी, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, किरकिटवाडी, वडगाव बुद्रुक, धायरी, वाघोली, धानोरी, लोहगाव, सूस, पाषाण या भागातून टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्या भागात महापालिकेला पाणीपुरवठा करण्यास जमत नाही. जेथे कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होतो. किंवा जलवाहिन्यांचे जाळे विकसित झालेले नाही, त्या भागांत महापालिका टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करते. हे पाणी मोफत दिले जाते. तसेच शहराच्या विविध भागांतील नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका ठराविक शुल्क घेऊन पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणी देते. तर खासगी ठेकेदारांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कमी दरात टँकर भरुन देते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु