
मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। अॅक्सिस बँक या भारतातील अग्रगण्य खासगी क्षेत्रातील बँकेने महिला उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘विमेन्स स्मॉल बिझनेस बँकिंग (एसबीबी)’ हा विशेष उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली आहे. महिला-नेतृत्वांतर्गत उद्योगांना परवडणाऱ्या आणि सुव्यवस्थित आर्थिक सुविधा सहज उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या सुविधेमध्ये कर्जपुरवठा, सर्वसमावेशक बँकिंग सेवा आणि चालू खात्याशी संबंधित विविध लाभांचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची वाढ आणि स्थिरतेसाठी पूरक असा एकात्मिक बँकिंग अनुभव मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत महिला-नेतृत्वाखालील एमएसएमई उद्योगांना सवलतीच्या दरात बँकिंग सुविधा मिळू शकतील. यामध्ये तारणाधारित तसेच क्रेडिट गॅरंटी अंतर्गत मिळणाऱ्या कर्जांवरील व्याजदरात संभाव्य सवलतींचा समावेश आहे. दैनंदिन व्यावसायिक व्यवहार आणि रोख रकमेचे व्यवस्थापन सुलभ व्हावे, यासाठी चालू खात्यावर ठराविक विशेष फायदे दिले जातील. या माध्यमातून परवडणाऱ्या कर्जसुविधांची व्याप्ती वाढवून महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी मदत करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.
‘विमेन्स स्मॉल बिझनेस बँकिंग’ ही सुविधा वैयक्तिक मालकी, भागीदारी, एलएलपी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या अशा विविध व्यवसाय प्रकारांसाठी उपलब्ध आहे. कर्जाच्या संपूर्ण कालावधीत हे लाभ लागू राहतील आणि अॅक्सिस बँकेच्या शाखांमधील ‘स्मॉल बिझनेस बँकिंग' (एसबीबी) टीममार्फत या सेवा पुरवल्या जातील.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत अॅक्सिस बँकेच्या कमर्शियल बँकिंग ग्रुपचे प्रेसिडेंट & हेड विजय शेट्टी म्हणाले, “महिला-नेतृत्वाखालील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. उद्यम प्लॅटफॉर्मवर ३ कोटींहून अधिक महिला-नेतृत्वाखालील एमएसएमई उद्योगांची नोंदणी असून ते उद्योजकता, रोजगार आणि नवनिर्मितीमध्ये मोठे योगदान देत आहेत. भारत जसा बहु-ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, तसे या उद्योगांना संरचित आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठे आर्थिक मूल्य निर्माण होईल आणि सर्वसमावेशक विकासाला गती मिळेल.
या ‘विमेन्स स्मॉल बिझनेस बँकिंग' सुविधेच्या माध्यमातून, अॅक्सिस बँकेचा उत्तम कार्यप्रणाली तयार करण्याचा मनसुबा आहे, जी आर्थिक सुलभता वाढवेल, आर्थिक उपलब्धता अधिक दृढ करेल आणि महिला उद्योजकांना आत्मविश्वासाने त्यांचे उद्योग वाढवण्यासाठी व ते स्थिरपणे चालवण्यासाठी सक्षम करेल.''
या शुभारंभाद्वारे, अॅक्सिस बँक सर्वसमावेशक उद्योजकतेला बळ देण्याच्या आणि महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमईंना पाठबळ देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला दृढ करत आहे. दीर्घकालीन व्यवसाय विकास आणि स्थिरता लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या सवलतीच्या आर्थिक उपायांद्वारे ही मदत केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर