
नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) : आसाम विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रद्युत बोरदोलोई यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांना भाजपमध्ये सामील होण्यास मदत केली. याप्रसंगी मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, प्रद्युत बोरदोलोई यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची परवानगी मिळावी, यासाठी आसाम भाजप केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती करेल. लोकसभा सदस्य प्रद्युत बोरदोलोई यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. कॉटन कॉलेज (आता विद्यापीठ) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले बोरदोलोई २०१६ पर्यंत मार्गेरिटा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार होते.
काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का बसला असून, आसाम विधानसभा निवडणुकीला अवघे २० दिवस शिल्लक असताना, लोकसभा सदस्य प्रद्युत बोरदोलोई यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. राज्य काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख बेदाब्रता बोरा यांनी सांगितले की, बोरदोलोई यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे. नागाव लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या बोरदोलोई यांचा मुलगा, ९ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मार्गेरिटा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार आहे. खर्गे यांना उद्देशून लिहिलेल्या आपल्या एका ओळीच्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे, जड अंतःकरणाने, मी काँग्रेसमधील सर्व पदे, विशेषाधिकार आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना प्रद्युत बोरदोलोई म्हणाले की, काँग्रेसच्या दुर्लक्षित धोरणांमुळे विविध समुदाय पक्षापासून दुरावले आहेत. त्यांनी आरोप केला की, पक्षाने समाजातील विविध घटकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपला पाठिंबा कमकुवत झाला आहे. ते म्हणाले, काँग्रेसला कोणाचीही पर्वा नाही. सर्व समुदायांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच पक्षाची ही सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
खासदार प्रद्युत बोरदोलोई पुढे म्हणाले की, काँग्रेस नेतृत्व आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमधील अंतर सातत्याने वाढत गेले आहे, ज्यामुळे नेते आणि समर्थक पक्षातून बाहेर पडत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे