
अमरावती, 22 मार्च (हिं.स.)
उन्हाचे प्रखर चटके आता सर्वांनाच बसत असल्याने मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील वन्यप्राण्यांची तहान भागविण्याच्या दृष्टीने व्याघ्रप्रकल्पाने २४० पाणवठे तयार केले. त्यात नियमित पाणी भरण्यात येत आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्प क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अतिशय मोठा आहे. याठिकाणी वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानगवे, नीलगाय, रानकुत्रे, मोर यासह शेकडो प्रकारचे प्राणी व पक्षांच्या प्रजाती आहेत. देशातील विविध संपन्न जंगलामध्ये मेळघाटचे नाव अव्वल दर्जाचे आहे. गुगामल राष्ट्रीय अभयारण्यसुद्धा याठिकाणी आहे. मेळघाटचे जंगल हे डोंगर-उताराचा प्रदेश आहे. याठिकाणी वन्यप्राण्यांचा मोठा प्रमाणात वावर आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे त्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असते. त्यामुळे वन्यप्राण्यांची तहान भागविण्याच्या दृष्टीने व्याघ्रप्रकल्पाने जंगलामध्ये ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत, तसेच नैसर्गिक पाणवठेसुद्धा आहेत. काही ठिकाणी बोअरवेल तयार करण्यात आले असून या माध्यमातून वन्यप्राण्यांची तहान भागविल्या जाते. परंतु अनेक ठिकाणी बोअरवेलला सुद्धा पाणी लागत नाही, अशा ठिकाणी या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकून वन्यप्राण्यांची तहान भागविल्या जाते. मेळघाट व्याघ्रप्रकल्पामध्ये गुगामल वन्यजीव अंतर्गत शंभर कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत, तर १४० नैसर्गिक पाणवठे आहेत.
वन्यजिवांसाठी लागले टँकर
दुर्गम भागात नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत, त्यामुळे अशा ठिकाणी टँकरच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठे भरले जात आहेत. जंगलातील नैसर्गिक झरे आणि डोहांची स्वच्छता करण्यात आली असून, आवश्यक तिथे नवीन कृत्रिम पाणवठे कार्यान्वित करण्यात आले आहेत. उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून वन्यप्राण्यांना २४ तास पाणी उपलब्ध राहील, याची दक्षता वनकर्मचाऱ्यांमार्फत घेतली जात आहे.
वन्यजीव वस्त्यांकडे वळू नये म्हणून...
वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे वळू नयेत, जेणेकरून मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येईल, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वन्यजीवांचे संवर्धन आणि त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे ही आमची प्राथमिकता आहे, असे उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी सांगितले.
जंगलातील पाणी उन्हामुळे कमी होत आहे. त्यामुळे जंगलातील पाणवठ्यामधील पालापाचोळा स्वच्छ करण्यात आला असून कृत्रिम पाणवठ्यामध्ये सुद्धा पाणी भरण्यात येत आहे. जंगलामध्ये ३५ ते ४० ठिकाणी बोअरवेल मान्य झाले आहेत. त्याठिकाणावरून सुद्धा वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. -राहुल दाईत, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत कमी होत असताना, मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी गुगामल वन्यजीव विभागामार्फत युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गुगामल विभागांतर्गत येणाऱ्या विविध वनपरिक्षेत्रांतील नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्यांमध्ये वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. -कीर्ती जमदाडे-कोकाटे, उपवनसंरक्षक.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी