नाशिक - जागतिक जल दिनानिमित्त ब्रह्मगिरीवर ‘स्वच्छ ब्रह्मगिरी अभियान’
९८० किलो प्लास्टिक कचरा संकलित, ‘स्वच्छ कुंभ २०२७’साठी व्यापक मोहीमेची सुरुवात नाशिक, 22 मार्च, (हिं.स.) : जागतिक जल दिनाचे औचित्य साधत सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणच्या वतीने तसेच सेंट्रल बँक ऑफ इं
Clean Brahmagiri Campaign


९८० किलो प्लास्टिक कचरा संकलित, ‘स्वच्छ कुंभ २०२७’साठी व्यापक मोहीमेची सुरुवात

नाशिक, 22 मार्च, (हिं.स.) : जागतिक जल दिनाचे औचित्य साधत सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणच्या वतीने तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सत्संग फाउंडेशन यांच्या सौजन्याने त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर ‘स्वच्छ ब्रह्मगिरी अभियान’ राबविण्यात आले. गोदावरी नदीच्या उगमस्थानी असलेल्या या पवित्र स्थळावर पार पडलेल्या या उपक्रमात सुमारे ९८० किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात दाखल होणार असल्याने स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय संवर्धन यासाठी पूर्वतयारी म्हणून अशा उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. ‘स्वच्छ कुंभ २०२७’ या संकल्पनेअंतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती करत नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात असून, ब्रह्मगिरीवरील हा उपक्रम त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.

या उपक्रमात श्री पंचायती आनंद अखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती महाराज, श्री पंचायती दशनाम आवाहन अखाड्याचे थानापती महंत शांतिगिरीजी महाराज, श्री पंचायती अग्नी अखाड्याचे थानापती महंत दुर्गानंद ब्रह्मचारी, श्री पंचायती बडा उदासीन निर्वाणी अखाड्याचे थानापती महंत दानमुनीजी महाराज तसेच शिवानंदनी महाराज, श्री पंचायती महानिर्वाणी अखाड्याचे महंत दिगंबर अजयपुरीजी महाराज तसेच श्री पंचायती नवा उदासीन अखाड्याचे थानापती महंत गोपालदासजी महाराज आणि भगतरामजी महाराज यांची उपस्थिती होती. ताल विकास पखवाज वारकरी गुरुकुल त्र्यंबकेश्वर ह भ प कैलास महाराज तांबे यांची आणि तेथील विद्यार्थ्यांचीही उपस्थिती लाभली.

तसेच वन विभाग (पश्चिम विभाग) उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपाध्यक्षा मंजू वारूनसे, मुख्याधिकारी राहुल पाटील, कुंभमेळा प्राधिकरणाचे सहाय्यक आयुक्त अमोल चौधरी, तहसीलदार मकरंद दिवाकर, सत्संग फाउंडेशनचे प्रतिनिधी, वन विभाग, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, नाशिक ग्रामीण पोलीस यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमात नाशिक एज्युकेशन सोसायटीची आश्रमशाळा, वेलुंजे, के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, गिरिदुर्ग भटकंती ट्रेकर्स ग्रुप तसेच भार्गवी महिला सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. ब्रह्मगिरीवरील विविध ट्रेकिंग मार्गांवर कचरा संकलन, वर्गीकरण तसेच सुरक्षित विल्हेवाट यावर भर देण्यात आला.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “जागतिक जल दिनाच्या निमित्ताने ब्रह्मगिरीसारख्या गोदावरीच्या उगमस्थानी स्वच्छता अभियान राबविणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुंभमेळा २०२७च्या तयारीत स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून ती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ब्रह्मगिरीवरील हा उपक्रम हा व्यापक मोहिमेचा प्रारंभ असून, पुढील काळात कुंभमेळा क्षेत्रातील विविध ठिकाणी अशा स्वच्छता उपक्रमांची मालिका राबविण्यात येणार आहे. नागरिकांचा सहभाग वाढवून स्वच्छ आणि शाश्वत कुंभमेळा साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती त्रिवेणी तुंगार म्हणाल्या, “ब्रह्मगिरीच्या स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर आम्ही लक्ष देत असून, हा उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

‘स्वच्छ ब्रह्मगिरी अभियान’ हे केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता कुंभमेळा क्षेत्रातील विविध ठिकाणी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण जनजागृती यासाठी सातत्याने अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande