परभणी - श्रीक्षेत्र त्रिधारा येथील श्री ओंकारेश्वर देवस्थान परिसरात विविध विकासकामांना भव्य प्रारंभ
परभणी, 22 मार्च (हिं.स.)। श्रीक्षेत्र त्रिधारा येथील श्री ओंकारेश्वर देवस्थान परिसरात विविध विकासकामांना भव्य प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले असून, यामुळे
अ


परभणी, 22 मार्च (हिं.स.)।

श्रीक्षेत्र त्रिधारा येथील श्री ओंकारेश्वर देवस्थान परिसरात विविध विकासकामांना भव्य प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले असून, यामुळे संपूर्ण देवस्थान परिसर आता कॅमेर्यांच्या देखरेखीखाली आला आहे.

याचवेळी अन्नछत्रासाठी बोलेरो पिकअप वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी स्वच्छता कामगारांची नियुक्ती आणि सिक्युरिटी गार्डची व्यवस्था करण्यात आली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सपत्नीक श्री ओंकारेश्वर नाथाचे दर्शन घेतले व देवस्थान परिसराची पाहणी केली. देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव भरोसे, सुभाषराव जावळे, तुकाराम सूर्यवंशी, अॅड. शिवाजीराव आहेर, पुरभाजी जावळे, राजकुमार भांबरे, माणिकराव शिंदे, रामेश्वर शिंदे, माऊली जावळे, उमाकांत भरोसे, उत्तमराव भरोसे, नामदेवराव चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, त्रिधारा म्हणजे श्रद्धा, स्वच्छता आणि समर्पण. या तीन तत्त्वांवर आधारित कार्य केल्यास परिसराचा सर्वांगीण विकास साध्य होईल. तसेच त्यांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष भर देत भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

दरवर्षी लाखो भाविक श्रीक्षेत्र त्रिधारा येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात दररोज सुमारे दहा हजार भाविक दर्शन, स्नान व महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच प्रत्येक अमावस्येलाही येथे मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. त्रिधारा येथील पवित्र गंगाजलात स्नान केल्यास रोग नाहीसे होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ लक्षात घेता सुरक्षितता आणि स्वच्छता अबाधित राखण्यासाठी देवस्थानच्या वतीने सीसीटीव्ही यंत्रणा व स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande