
परभणी, 22 मार्च (हिं.स.)।तक्रारीकरीता पोलिस प्रशासनाने उपलब्ध केलेल्या ‘डायल 112’ यावर खोटी माहिती देणार्या विरुध्द जिंतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या तालुक्यातील मोहाडी येथील तरुणाने मोबाईलद्वारे डायल 112 वर मारहाण झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने चौकशी सुरु केली तेव्हा संबंधित मोबाईलधारक मोबाईल बंद करुन बसला. जेव्हा पोलिसांनी त्यास शोधून पोलिस ठाण्यात बोलावले असता त्याने अशी काहीही घटना घडली नाही, असे नमूद करीत उडवा उडवीची उत्तरे द्यावयास सुरुवात केली. जिंतूर पोलिसांनी तातडीने या व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहीता कलम 212, 217 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
दरम्यान, डायल 112 सुविधा ही नागरीकांच्या तक्रारींकरीता सुविधा म्हणून उपलब्ध करण्यात आली आहे. गरजवंतांना तात्काळ पोलिसांची मदत मिळावी या करीता ही सुविधा आहे. कोणीही पोलिसांना त्रास होईल, या दृष्टीने डायल 112 ला कॉल करुन खोटी माहिती देऊ नये, अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis