
नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.)। मतदारांचा अनुभव अधिक सुखद आणि सुलभ करण्यासाठी भारत निवडणूक आयोग (इसीआय) यांनी ‘किमान सुविधा’ आणि ‘मतदार सहाय्य’ याबाबत कडक निर्देश जारी केले आहेत. निवडणूक होणाऱ्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एकूण २,१८,८०७ मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा अनिवार्यपणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आयोगाने मतदान केंद्रांवरील मूलभूत पायाभूत सुविधांना बळकटी देण्यावर विशेष भर दिला आहे. यामध्ये मतदान सुविधा केंद्रांत (एएमएफ) पिण्याचे पाणी, सावलीयुक्त प्रतीक्षा व्यवस्था, पाण्याची सोय असलेले स्वच्छतागृह, पुरेशी प्रकाशयोजना, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उतार असलेले रॅम्प, मानक मतदान कक्ष आणि योग्य दिशादर्शक फलक यांचा समावेश आहे. तसेच मतदान अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, मतदारांना रांगेत थांबताना बसता यावे यासाठी ठराविक अंतरावर बाके (बेंच) लावण्यात यावीत.
मतदार जागरूकता वाढवण्यासाठी, प्रत्येक मतदान केंद्रावर चार एकसमान आणि प्रमाणित मतदार सुलभता भीत्तीपत्रक (व्हीएफपी) ठळकपणे प्रदर्शित केले जातील. यामध्ये मतदान केंद्राची माहिती, उमेदवारांची यादी, करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी, मान्य ओळखपत्रांची यादी आणि मतदान प्रक्रिया यांचा समावेश असेल.
यावेळी निवडणुकांमध्ये तंत्रज्ञान आणि सहाय्य सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहाय्य कक्ष (व्हीएबी) स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) आणि कर्मचाऱ्यांची टीम असेल. ही टीम मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि यादीतील नाव शोधण्यासाठी मदत करेल. मतदार सहाय्य कक्षावर स्पष्ट दिशादर्शक फलक असतील, जे मतदारांना सहज दिसतील.
मतदारांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराबाहेर मोबाईल फोन जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदार मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आपला मोबाईल बंद करून नियुक्त स्वयंसेवकाकडे जमा करू शकतात आणि मतदानानंतर परत घेऊ शकतात.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, या सर्व उपाययोजना अनिवार्य असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मतदानाच्या तारखेपूर्वीच या सुविधा पूर्णपणे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule