मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन
मुंबई, 22 मार्च (हिं.स.) - भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर अलका केरकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज, रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अलका केरकर


मुंबई, 22 मार्च (हिं.स.) - भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर अलका केरकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज, रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी आहे. त्या वांद्रे पश्चिमच्या प्रभाग क्र. ९८ मधून विद्यमान नगरसेविका होत्या.

अलका केरकर यांनी 2014-15 मध्ये मुंबई उपमहापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील अनेक योजनांचे यशस्वी आयोजन झाले. नुकत्याच झालेल्या 2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी वांद्रे पश्चिम (वॉर्ड 98) मधून महायुतीच्या उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्या महापौरपदाच्या शर्यतीतील आघाडीच्या उमेदवारांपैकी एक होत्या, त्यांच्या जाण्याने महापालिकेतील लोकशाही आणि सेवाभावी कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

शिक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या अनुभवामुळे अलकाताई नेहमीच जनतेच्या प्रश्नांना तळमळीने प्रतिसाद देत, प्रत्येक नागरिकासाठी तत्पर राहिल्या. भ्रष्टाचार विरोधी, निष्कलंक आणि साध्या जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अलकाताईंच्या कार्यशैलीमुळे त्या स्थानिक राजकारणातील आदर्श नेत्या ठरल्या. नागरी सुधारणा, आरोग्य आणि स्वच्छतेसारख्या क्षेत्रात त्यांनी ठोस काम केले. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले जवळचे संबंध आणि पक्षातील सक्रिय सहभाग यामुळे त्या नेहमीच प्रभावी राहिल्या.

अत्यंत शांत पण प्रत्येक कामाची इत्यंभूत माहिती आपल्या साध्या राहणीमानातून आणि प्रामाणिक कार्यपद्धतीतून जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.पक्षनिष्ठा, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि अनधिकृत कामांना कधीही थारा न देण्याचा त्यांचा ठाम स्वभाव यामुळे त्या आदर्श नगरसेविका म्हणून ओळखल्या जात होत्या.

भाजपाचे नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी अलकाताईंच्या योगदानाचे कौतुक करत, त्यांच्या निधनामुळे वांद्रे पश्चिममध्ये अपूरणीय नुकसान झाल्याचे सांगितले. गेली तीस वर्षे त्यांनी प्रभागातील जनता आणि पक्षाला दिलेल्या सेवेसाठी त्या नेहमीच स्मरणात राहतील.अलका केरकर यांचे निधन फक्त राजकीय वर्तुळासाठीच नव्हे, तर त्यांच्या कार्यातून प्रेरित होणाऱ्या प्रत्येक सेवाभावी व्यक्तीसाठीही मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या साध्या जीवनशैलीतून आणि जनतेसाठी केलेल्या योगदानातून त्यांचे स्मरण कायम राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande