
बीड, 22 मार्च (हिं.स.)।
पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने अलंकारिक महापूजा करण्यात आली. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. सायंकाळी भगव्या ध्वजाची पूजा वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.
परळीत अलंकारिक पूजेच्या रूपाने प्रभूचे दर्शन घेताना भाविक भारावून गेले. आमदारधनंजय मुंडे यांनी सपत्नीक दर्शन घेतले. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे वर्षभरात गुढीपाडवा, विजयादशमी, मकरसंक्रांती, महाशिवरात्री या प्रमुख सणाला अलंकारिक महापूजा केली जाते.
शतकोत्तर परंपरा असलेल्या शंभू
महादेवाच्या वाघाची काठी व कावडीची परंपरा गावभागतील जंगम गल्ली येथे जपली गेली आहे. मानकरी मठपती परिवार आणि गावभागातील नागरिकांच्या उपस्थितीत शंभू महादेवाच्या काठीची, कावडीची पूजा करून जंगम गल्ली येथे काठी तळहातावर खेळविण्यात आली. शहरातील पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. मठपती संजय स्वामी, दयानंद स्वामी, सोमनाथ स्वामी, गणेश स्वामी, वाघेश स्वामी, विक्रम स्वामी, माजी नगरसेवक शंकराप्पा मोगरकर, नगरसेविका जयश्री मोगरकर, नगरसेवक योगेश मेनकुदळे, नितीन बागवाले, वैजनाथ बँकेच्या संचालिका माधुरी मेनकुदळे, महादेव ईटके, विकास हालगे, अश्विन मोगरकर आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis