
पिंपरी, 22 मार्च (हिं.स.)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागाकडून प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत नागरिक व व्यावसायिकांकडून एकूण ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून प्लास्टिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहा. आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.या मोहिमेत प्रभाग क्रमांक ०८, इंद्रायणी नगर येथे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत देऊन १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. याच ठिकाणी आरोग्य विघातक कृत्ये, कचरा टाकणे व प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करत आणखी ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच प्रभाग क्रमांक ०९, नेहरू नगर येथे करण्यात आलेल्या कारवाईत १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, आरोग्य सहाय्यक गीता रिल व जगदीश चिंचोलीकर तसेच, अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी केले.महापालिकेच्या या कारवाईमुळे प्लास्टिक वापरावर आळा बसण्यास मदत होत असून शहर स्वच्छ व वसुंधरापूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे मत क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांनी यावेळी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु