
सोलापूर, 22 मार्च (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिकेतील २०१४ मधील बस खरेदी प्रकरणातील कथित ‘चेसी क्रॅक’ घोटाळ्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात तब्बल ५६ कोटी रुपयांची भरपाई महापालिकेच्या तिजोरीतून – म्हणजेच सोलापूरकरांच्या खिशातून वसूल केली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने संताप व्यक्त केला.याच्या निषेधार्थ २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.२०१४ मध्ये सोलापूर महानगरपालिकेने अशोक लेलँड कंपनीकडून १४४ बसेस खरेदी केल्या होत्या. मात्र या बसेसमधील ९९ बसेसच्या चेसीमध्ये क्रॅक आढळल्याचा प्रकार उघडकीस आला. आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र असतानाही या बसेस निकृष्ट दर्जाच्या निघाल्या. हा केवळ तांत्रिक दोष नसून अधिकारी आणि कंपनीमधील संशयास्पद करारामुळे झालेला सुनियोजित घोटाळा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.या प्रकरणी झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता ५६ कोटी रुपयांची भरपाई महापालिकेकडून करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा आर्थिक भार अखेर सामान्य नागरिकांवर पडत असल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड