
नांदेड, 22 मार्च (हिं.स.)।
नांदेड शहरातील विवेक नगर परिसरात असलेल्या श्री मारुती मंदिराच्या नूतनीकरणानिमित्त भव्य 'श्रीराम कथा' ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, २६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत हा सोहळा भक्तिभावाने संपन्न होणार आहे. या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. या ज्ञानयज्ञात राष्ट्रीय कथाव्यास पूज्य श्री प्रणव शास्त्री धानोरकर गुरुजी आपल्या ओघवत्या व प्रभावी शैलीतून रामकथेचे रसाळ विवेचन करणार आहेत. राष्ट्रसंत श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे कृपांकित शिष्य असलेल्या धानोरकर गुरुजींच्या अमृतवाणीतून श्रीराम कथा ऐकण्याची सुवर्णसंधी नांदेडकरांना लाभणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्री मारुती मंदिर ट्रस्ट व स्थानिक भाविकांच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य शोभायात्रेने होणार असून, त्यानंतर दुपारी ४ ते ७या वेळेत 'लवकुश रामायण गायन' सादर केले जाणार आहे.
शुक्रवार, २७ मार्च रोजी 'अयोध्या वर्णन व श्रीराम जन्म' हा प्रमुख सोहळा रंगणार आहे. शनिवार, २८ मार्च रोजी 'योग वसिष्ठ, श्रीराम विवाह व राज्याभिषेकाची तयारी' या विषयांवर कथा सादर होईल.
रविवार, २९ मार्च रोजी 'श्रीराम वनाभिगमन व केवट प्रसंग', तर सोमवार, ३० मार्च रोजी 'अगस्ती-राम भेट, पंचवटी व सीताहरण' या प्रसंगांचे प्रभावी वर्णन केले जाईल. याच दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत प्रा. अभिजीत अपस्तंभ, सौ. सारिका पांडे व संच यांच्या वतीने 'गीतरामायण' हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मंगळवार, ३१ मार्च रोजी 'शबरी, सुग्रीव मैत्री व सुंदर कांड' यांचे कथन होईल. बुधवार, १ एप्रिल रोजी 'रावणवध' तर गुरुवार, २ एप्रिल रोजी 'श्रीराम राज्याभिषेक' या भव्य सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता होईल. याच दिवशी सकाळी १० वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिराच्या नूतनीकरणानिमित्त आयोजित हा ज्ञानयज्ञ नांदेडच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत मोलाची भर घालणारा ठरेल, असा विश्वास नगरसेवक आशिष नेरलकर यांनी व्यक्त केला आहे. या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis