सोशल मिडीयावरील पोस्टची दखल;अपघातग्रस्त युवकाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत
परभणी, 22 मार्च (हिं.स.) - जिल्ह्यातील सुनेगाव (ता. गंगाखेड) येथील दुचाकी अपघातग्रस्त गंभीर जखमी झालेल्या तरूणाच्या उपचाराकरिता सोशल मिडीयावर मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जिल्हा कक्षाने तातडीने दखल घ
सोशल मिडीयावरील पोस्टची दखल;अपघातग्रस्त युवकाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत


परभणी, 22 मार्च (हिं.स.) - जिल्ह्यातील सुनेगाव (ता. गंगाखेड) येथील दुचाकी अपघातग्रस्त गंभीर जखमी झालेल्या तरूणाच्या उपचाराकरिता सोशल मिडीयावर मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जिल्हा कक्षाने तातडीने दखल घेत पुढाकार घेतला. राज्य कक्षाच्या निर्देशानुसार माधव मंचकराव सूर्यवंशी (वय 21) या रुग्णाच्या उपचाराकरिता तात्काळ एक लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. या मदतीमुळे त्याच्यावर वेळेत उपचार झाले.

गंगाखेड तालुक्यातील माधव घटनेच्या दिवशी कामानिमित्त दुचाकीने प्रवास करत असताना त्याचा भीषण रस्ते अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करणे कुटूंबियांना शक्य नव्हते. कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.

माधवचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. शेतीचा कोणताही आधार नसून माधव स्वतः फिल्टर वॉटर प्लांटवर काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्यान, माधवच्या मित्राने सोशल मिडीयावर मदतीचे आवाहन केले. त्यातून काही आर्थिक मदत जमा झाली; मात्र उपचाराचा संपूर्ण खर्च भागवण्यासाठी अतिरिक्त मदतीची गरज होती. दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्ष परभणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी इप्पर यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधून राज्य कक्षाला माहिती दिली. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी मदतीबाबत सकारात्मकता दाखवली. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करण्यात आला. परिणामी, माधवला वेळेत आर्थिक मदत मिळाली. माधव व त्याच्या कुटुंबीयांनी संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे आभार व्यक्त केले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande