
बीड, 22 मार्च (हिं.स.)।
अंबाजोगाईचे सुपुत्र आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुधाकर पंडितराव कुर्डूकर यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबाजोगाईच्या देशपांडे गल्लीतील मूळ रहिवासी असलेल्या न्यायमूर्ती कुर्डूकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत न्यायव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले. त्यांनी मार्च १९९६ ते जानेवारी २००० या काळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळली होती. विशेष म्हणजे १९९४ मध्ये त्यांनी पंजाबचे प्रभारी राज्यपाल म्हणूनही पद भूषवले होते. कायदेशीर क्षेत्रासोबतच त्यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक कार्यातही सहभाग नोंदवला. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने कायदेतज्ज्ञ आणि अंबाजोगाई परिसरात शोककळा पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis