
परभणी, 22 मार्च (हिं.स.)।
राज्य शासनामार्फत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रानुसार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरीय धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या माध्यमातून चालकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
सदर मंडळामार्फत जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास रुपये 50 हजारांपर्यंत अर्थसहाय्य, चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्यवृद्धी प्रशिक्षण, तसेच 65 वर्षांवरील परवानाधारक चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय नवीन ऑटो रिक्षा/ मिटर्ड टॅक्सी खरेदी व गृहखरेदीसाठी कर्ज सुविधा आणि राज्यस्तरीय मंडळाने मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजनांचाही समावेश आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित ऑटो रिक्षा व मिटर्ड टॅक्सी परवानाधारक चालकांनी मंडळाचे सभासद होणे आवश्यक आहे. सभासद नोंदणी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून नोंदणी शुल्क रुपये 500 व वार्षिक सभासद शुल्क रुपये 300 निश्चित करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशिष पाराशर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis