
पुणे, 22 मार्च (हिं.स.)युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेल्या गॅसटंचाईमुळे सामान्यांना सिलिंडरचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी यापूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांनाच प्राधान्य द्यावे, अशा सक्त सूचना जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सींना दिल्या आहेत. त्यामुळे ज्या एजन्सीधारकांकडे अधिकचे बुकिंग आहे, अशांना प्राधान्याने सिलिंडरचे वितरण करण्यात येत आहे.
वेटिंगवरील ग्राहकांना प्राधान्याने सिलिंडर देण्यासाठी संबंधित एजन्सींना अधिकचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत पुढील तीन ते चार दिवसात सामान्य होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.गॅसटंचाई निर्माण झाल्यानंतर भीतीपोटी नागरिकांनी सिलिंडर बुकिंगचा धडाका लावला. त्यामुळे वितरणामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी सिलिंडरसाठी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्ष मागणी व पुरवठा यात मोठा फरक दिसून आला. यावर उपाययोजना होऊन जिल्हा प्रशासनाने सिलिंडरचे बुकिंग ऑनलाइन केल्यानंतर येणाऱ्या ओटीपीवरच सिलिंडरचे वितरण करण्याचे निर्देश एजन्सीधारकांना दिले. परिणामी गेल्या पाच दिवसांपासून सिलिंडरच्या वितरणात सुरळीतपणा आला आहे.
जिल्ह्यातील एजन्सींसमोर लागणाऱ्या रांगा बंद झाल्या असून, ग्राहकांना आता घरपोच सिलिंडर मिळत आहेत. गॅस कंपन्यांनीदेखील ज्या एजन्सीधारकांकडून सर्वाधिक बुकिंग आले आहे, अशा गॅस एजन्सींना ज्यादा पुरवठा करण्याचे ठरविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु