
नांदेड, 27 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्र आणि कर्नाटकला रेल्वे मार्गाने जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड-देगलूर-बिदर आणि बोधन-बिलोली-नरसी-मुखेड- लातूर रोड या रेल्वे प्रकल्पांना तातडीने गती देण्यात यावी अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली. याचवेळी त्यांनी मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्नांवरही सभागृहासमोर प्रश्न मांडले. मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्नाबाबत खा. डॉ अजित गोपछडे यांनी आज आग्रही भूमिका घेत प्रश्न उपस्थित केले.
सभागृहाच्या माध्यमातून त्यांनी सरकारचे लक्ष वेधताना सांगितले की, नांदेड-देगलूर-बिदर या नव्या रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी ५० टक्के आर्थिक सहभागाची सहमती दिली आहे. केंद्र सरकारने कर्नाटक आणि तेलंगणा सरकारशी समन्वय साधून या प्रकल्पाला प्राधान्याने पुढे न्यावे, असे त्यांनी नमूद केले. हा प्रकल्प केवळ एक रेल्वेमार्ग नसून उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा धोरणात्मक संपर्क मार्ग ठरू शकतो, ज्यामुळे दोन्ही भागांतील अंतर सुमारे १५० किलोमीटरनेकमी होईल. यामुळे बेंगळुरू सारख्या आयटी केंद्र आणि नागपूर सारख्या औद्योगिक शहरांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच, नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर फाइव्ह स्टार एमआयडीसीला नवसंजीवनी मिळून औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल. यातून नव्या रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील नांदेड सह मराठवाड्याच्या नव्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. वरील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांचे महत्व सभागृहाच्या निदर्शनास आणून देत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी बोधन-बिलोली-नरसी-मुखेड-लातूर रोड या नव्या रेल्वेमार्गाचा मुद्दाही उपस्थित केला. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळालेली असून, ती वेळेत पूर्ण करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis