
लातूर, 27 मार्च, (हिं.स.)। रेणापूर तालुक्यातील खेळाडूंची प्रतीक्षा संपली असून, सुमारे ₹३.३८ कोटी खर्चाच्या तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या क्रीडा संकुलासाठी राज्य शासनाकडून ₹३ कोटी ३८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत कबड्डीची चार मैदाने, खो-खोची दोन मैदाने, बॅडमिंटन हॉल, कार्यालयीन इमारत, ४०० मीटर लांबीचा धावनपथ (रनिंग ट्रॅक) तसेच भव्य कंपाउंड वॉल उभारण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ मिळावे यासाठी या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यात आला होता. कामाची गुणवत्ता अबाधित ठेवत वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे रेणापूरमधील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात, उपअभियंता लक्ष्मण देवकर, पंचायत समिती उपसभापती शरद दरेकर, नगराध्यक्षा शोभा आकनगिरे, सहअभियंता प्रवीण पवार, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis