
नांदेड, 27 मार्च (हिं.स.)।वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे केलेले आणि सध्या नायगाव तालुक्यात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले गजानन व्यंकटराव कोतलवार यांना वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वन सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सन २०२४-२५ या वर्षाचा वन विभागाचा सर्वोच्च पुरस्कार 'सुवर्णपदक' शासनाने जाहीर केले आहे. मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणे तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्याकरिता त्यांना दरवर्षी राज्यस्तरावरुन पुरस्कार व बक्षिसे दिल्या जातात. वनविभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी वनसंरक्षणार्थ, वन्यजीव संरक्षणार्थ, शोधकार्य, वनव्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण शोध याबद्दल प्रतिवर्षी सुवर्ण व रजत पदक बहाल करून गौरविण्यात येते. यासाठी मुख्य वनसंरक्षकांकडून उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांच्या शिफारशी मागविण्यात येतात.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis