
रायगड, 27 मार्च (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव आणि इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने केरोसीन वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने राज्यासाठी सुमारे ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीन वाटपास मंजुरी दिली आहे. त्यानुसार राज्यातील रेशनकार्डधारकांना केरोसीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमती आणि सिलिंडर मिळण्यास होणारा विलंब यामुळे नागरिकांना पर्यायी इंधनाची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर केरोसीनचा वापर पुन्हा वाढवण्याचा विचार करण्यात आल्याचे समजते.
राज्य सरकारकडून जिल्हानिहाय वितरणाचे नियोजन करण्यात आले असून मार्च-एप्रिल 2026 दरम्यान केरोसीन वाटप होणार आहे. Indian Oil Corporation, Bharat Petroleum आणि Hindustan Petroleum या तेल कंपन्यांमार्फत पुरवठा करण्यात येणार आहे. यातील सुमारे 85 टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात वितरित करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला सुमारे 3 लिटर केरोसीन देण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते. मात्र, याबाबत अंतिम अधिकृत आदेश आणि अंमलबजावणीची पुष्टी अद्याप प्रलंबित आहे.युद्धजन्य परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास इंधनपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारकडून पर्यायी उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)