
डोंबिवली, 28 मार्च (हिं.स.)।
कल्याण ग्रामीण मतदार संघातील निळजे येथे १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे. या अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना नुकतेच कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांनी दिले. या मागणीमुळे कल्याण ग्रामीणमधील २७ गावे, श्री मलंगगड परिसरातील ३६ गावे तसेच नवी मुंबई समाविष्ट झालेली १४ गावे या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्वरित व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल असेही आमदार मोरे यांनी स्पष्ट केले.
याबाबत मोरे यांच्या मते सध्याच्या परिस्थितीत निळजे येथील आरोग्य केंद्राची दुरावस्था व अपुरी सुविधा यामुळे आरोग्य कर्मचारी नागरिकांना अपेक्षित सेवा देऊ शकत नाहीत ही गंभीर बाब निदर्शनास आणली आहे. निळजे येथे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास सर्व नमूद गावांतील नागरिकांना तातडीची उपचार सेवा स्थानिक पातळीवरच मिळेल. ज्यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतील. आज निळजे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय किंवा कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय येथे जावे लागते. ही दोन्ही रुग्णालये लांब अंतरावर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत वेळेअभावी रुग्णांना मोठा धोका निर्माण होतो.
निळजे परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन गृहप्रकल्प उभे राहत असून वेगाने शहरीकरण होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अल्पउत्पन्न गटातील नागरिक वास्तव्यास असून ते सरकारी आरोग्य सेवांवर अवलंबून आहेत. मात्र सध्याच्या आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना उपचारासाठी डोंबिवली किंवा कल्याण येथील महानगरपालिका रुग्णालयांचा लांब पल्ला गाठावा लागतो ही चिंताजनक बाबा आहे.
परिणामी निळजे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास या संपूर्ण पट्ट्यातील नागरिकांना सर्व उपचार, आपत्कालीन सेवा, मातृत्व सेवा व विविध वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतील आणि परिसरातील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi