परळीतील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती
बीड, 27 मार्च (हिं.स.)।परळी शहरात अनेक पुरातन असे अनेक मंदिरे आहेत. जुन्या गावभागात प्रभू श्रीरामांचे वेगवेगळे वर्णन असलेले काळाराम, गोराराम व सावळाराम ही पुरातन मंदिरे आहेत. रामनवमीच्या दिवशी किर्तन, रामजन्मोत्सवा बरोबरच पुढील दिवस तिन्ही मंदिराच्
Q


बीड, 27 मार्च (हिं.स.)।परळी शहरात अनेक पुरातन असे अनेक मंदिरे आहेत. जुन्या गावभागात प्रभू श्रीरामांचे वेगवेगळे वर्णन असलेले काळाराम, गोराराम व सावळाराम ही पुरातन मंदिरे आहेत. रामनवमीच्या दिवशी किर्तन, रामजन्मोत्सवा बरोबरच पुढील दिवस तिन्ही मंदिराच्या पालख्या काढण्याची परंपरा असून यंदाही उत्साहात रामनवमी उत्सव साजरा झाला.

शहरातील या तिन्ही मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सवाची धूम दिसून आली. जुन्या गावभागात असणाऱ्या या मंदिरात भजन, कीर्तन यासह अनेक उपक्रम साजरे करण्यात आले. सावळाराम आणि काळाराम मंदिरातआरती आणि पाळणाच्या वेळी मंत्री पंकजा मुंडे आणि शहरातील माजी नगराध्यक्ष धर्माधिकारी, नगरसेवक आणि बांधकाम सभापती पवन मुंडे, नीलकंठ चाटे, रितेश तोतला, डॉ. शालिनी कराड आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते मंत्री पंकजा मुंडे यांचा पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.शहरांतील गणेशपार येथे गोराराम मंदिर आहे. या मंदिरातील मारुतीची मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः स्थापन केलेली आहे. समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी यांनी अयोध्येतुन आणलेल्या रामाच्या मूर्तीची स्थापना या मंदिरात केली आहे. तीनशे वर्षांपासून रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. रामायणाचे पारायण ९ दिवसांमध्ये करण्यात येते.

गणेशपार मंदिराच्या मागच्या बाजूस जुन्या वाड्यावजा जागेत सावळाराम मंदिर आहे. रामरक्षेतील पहिल्या श्लोकाप्रमाणे तीनशे वर्षापुर्वी संन्याशी वामन स्वामी यांनी या मुर्तीची स्थापना केली. रामाच्या डाव्या मांडीवर सिता व समोर हनुमान अशी आकर्षक मूर्ती आहे.नवीन शहर आणि गाव भागाला जोडणाऱ्या आंबे वेशीतील पुलाच्या नंतर प्रथम दर्शनी दिसते ते काळाराम मंदिर. या मंदिरात राम, सिता व लक्ष्मणाच्या वेगवेगळ्या तीन मुर्ती आहेत. ३५० वर्षापुर्वी नाशिक येथून या मूर्ती आणत स्थापना केलेली आहे. इथेही उत्सव साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी काळाराम मंदिराची पालखी निघते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande