नांदेडमध्ये इंधन तुटवड्याच्या अफवा फोल; ‘पॅनिक बायिंग’मुळेच कृत्रिम टंचाई – खासदारांचा इशारा
नांदेड, 27 मार्च (हिं.स.) :गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत पसरत असलेल्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले आहे. इंधन
नांदेडमध्ये इंधन तुटवड्याच्या अफवा फोल; ‘पॅनिक बायिंग’मुळेच कृत्रिम टंचाई – खासदारांचा इशारा


नांदेड, 27 मार्च (हिं.स.) :गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत पसरत असलेल्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले आहे. इंधनाचा कोणताही वास्तविक तुटवडा नसून ‘पॅनिक बायिंग’मुळे (भीतीपोटी मोठ्या प्रमाणात खरेदी) कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर खासदार आष्टीकर यांनी नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जाणीवपूर्वक इंधन साठवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सींमधील साठ्याची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, विशेषतः ग्रामीण भागात अफवा पसरू नयेत यासाठी ‘नोडल अधिकाऱ्यांची’ नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“नागरिकांनी संयम राखावा. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अफवांवर विश्वास ठेवून पंपांवर गर्दी करू नका. विनाकारण साठा टाळल्यास कोणालाही अडचण येणार नाही असे खासदार आष्टीकर यांनी म्हंटले आहे.

खासदारांनी पुढे स्पष्ट केले की, देशात आणि राज्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. भारत पेट्रोलियम (BPCL) प्रशासनानेही अखंड पुरवठ्याची खात्री दिली आहे. मात्र, सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे.

गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करण्याच्या प्रवृत्तीमुळे पुरवठा साखळीवर ताण येत असून, हीच कृत्रिम टंचाई निर्माण होण्याचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवावा, तसेच कोणतीही अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande