
नांदेड, 27 मार्च (हिं.स.)।
बिलोली शहरातील नगर परिषदेच्या
मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्थेत असलेल्या या शाळेच्या नवीन इमारतीसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियानांतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
बिलोली नगर परिषदेची ही शाळा १९७५-७६ मध्ये सुरू करण्यात आली होती.
शाळेसाठी १ कोटीचा निधी मंजूर झाला असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जुनी इमारत पाडून त्याठिकाणी लवकरच अत्याधुनिक आणि दर्जेदार इमारत उभी केली जाईल. गुणवत्तेसोबतच भौतिक सुविधांवरही आमचा भर आहे, अशी माहिती नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी दिली.
ही शाळा तत्कालीन नगराध्यक्ष तथा माजी आमदार गंगाधरराव पटणे यांनी सुरू केली. मात्र, गेल्या ५० वर्षात इमारतीची मोठी दुरवस्था झाली होती. मोडकळीस आलेल्या या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या शाळेला सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत मिळणार आहे.
या शाळेत सध्या उर्दू माध्यमाच्या १ली ते ४थी वर्गात १२० विद्यार्थी, तर मराठी माध्यमाच्या १ली ते ७ वी वर्गात ७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी व उर्दू माध्यमाचे सुमारे २०० विद्यार्थी आहेत, तर निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार-मिळणाऱ्या निधीमुळे विद्यार्थ्यांना प्रशस्त वर्गखोल्या आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis