
नांदेड, 27 मार्च (हिं.स.)।
भारतीय रेल्वेच्या विद्युत विभागाने फेब्रुवारी 2026 दरम्यान रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेद्वारे आणि ऊर्जा कार्यक्षमतेसंबंधी प्रतिष्ठित प्रमाणपत्रे मिळवून शाश्वत विकास आणि ऊर्जा बचतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. चालू असलेल्या नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांतर्गत विविध रेल्वे आस्थापनांवर रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थापना सातत्याने वाढविण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जानेवारी 2026 पर्यंत एकूण 290 KWP क्षमतेचे रूफटॉप सौर प्रकल्प स्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये विभागीय कार्यालय (DOC) येथे 30 KWP, IOH/नांदेड येथे 100 KWP, पूर्णा येथे 80 KWP आणि आदिलाबाद येथे 80 KWP क्षमतेचे प्रकल्प समाविष्ट असून हे प्रकल्प हरित ऊर्जा निर्मितीत महत्त्वाचे योगदान देत आहेत.
या उपक्रमाला अधिक बळकटी देत, फेब्रुवारी 2026 मध्ये अतिरिक्त 90 KWP क्षमतेचे रूफटॉप सौर प्रकल्प खालील ठिकाणी यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहेतः लासूर 10 KWP दिनेगाव - 20 KWP मुदखेड- 60 KWP नवीन स्थापित करण्यात आलेल्या 90 KWP क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधून दरवर्षी सुमारे 1 लाख 31 हजार 400 युनिट स्वच्छ वीज निर्मिती होण्याची अपेक्षा असून त्यामुळे रेल्वेला दरवर्षी सुमारे 13 कोटी 14 लाखांची बचत होणार आहे. आर्थिक
बचतीबरोबरच या प्रकल्पांमुळे पर्यावरणीय शाश्वततेलाही मोठे योगदान मिळणार असून दरवर्षी सुमारे 108 मेट्रिक टन CO उत्सर्जनात घट होणार आहे.
याशिवाय आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे जालना येथील कॅरेज अँड वॅगन इमारतीला भारत सरकारच्या ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो कडून शून्य प्लस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र अशा इमारतींना दिले जाते ज्या नेट पॉझिटिव्ह एनर्जी दर्जा प्राप्त करतात, म्हणजेच त्या इमारती वर्षभरात स्वतः वापरत असलेल्या ऊर्जे पेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्माण करतात. ही कामगिरी रेल्वेच्या ऊर्जा बचत, नवीकरणीय ऊर्जा वापर आणि पर्यावरणीय शाश्वततेबाबतच्या ठाम बांधिलकीचे प्रतीक आहे. तसेच हरित पायाभूत सुविधा विकसित करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे या राष्ट्रीय ध्येयाशीही ती सुसंगत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis