गॅस टंचाईवर उपाय : अमरावती जिल्ह्यासाठी १.०८ लाख लिटर केरोसिनचा साठा
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)। राज्यात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅसच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला मंजूर झालेल्या केरोसिन कोट्यातून
गॅस टंचाईवर उपाय : अमरावती जिल्ह्यासाठी १.०८ लाख लिटर केरोसिनचा साठा


अमरावती, 27 मार्च (हिं.स.)। राज्यात गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅसच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला मंजूर झालेल्या केरोसिन कोट्यातून अमरावती जिल्ह्यासाठी १०८ किलोलिटर (१ लाख ८ हजार लिटर) केरोसिनचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. हा साठा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी १२ किलोलिटर क्षमतेचे एकूण नऊ टँकर धावणार असून, ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना यामुळे तात्पुरता दिलासा मिळणार आहे.

शासकीय आदेशानुसार हे केरोसिन केवळ अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांपुरते मर्यादित नसून, ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही किंवा इंधनाची गरज आहे अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटुंब ३ लिटरप्रमाणे वाटप केले जाणार आहे. ज्या कुटुंबांकडे रेशन कार्ड नाही, त्यांनाही ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला किंवा ओळखपत्र सादर करून केरोसिन मिळू शकणार आहे.प्रशासनाच्या नियोजनानुसार अमरावती जिल्ह्याला मिळणारा १०८ केएल साठा तेल कंपन्यांच्या डेपोमधून जिल्ह्यात आणला जाईल. त्यानंतर घाऊक विक्रेत्यांमार्फत तालुका स्तरावर आणि तेथून स्वस्त धान्य दुकानांद्वारे नागरिकांपर्यंत वितरण केले जाईल. ग्राहक संरक्षण विभागाने २६ मार्च रोजी शासन निर्णय जारी करून राज्यातील ४२ शहर व जिल्ह्यांसाठी केरोसिनचे नियोजन जाहीर केले आहे.दरम्यान, केरोसिनचा काळाबाजार किंवा अधिक दराने विक्री करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि पोलिसांचे संयुक्त पथक लक्ष ठेवणार आहे. तसेच केरोसिनचा वापर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये भेसळीसाठी होऊ नये यासाठीही कडक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande