प्रशांत दामलेंनी दिली नांदेड महापालिकेच्या प्रेक्षागृहास भेट
नांदेड, 27 मार्च (हिं.स.)। प्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहास भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. या भेटीनंतर त्यांनी महापालिका प्रशासनाशी संवाद साधला.
प्रशांत दामलेंनी दिली नांदेड महापालिकेच्या प्रेक्षागृहास भेट


नांदेड, 27 मार्च (हिं.स.)। प्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहास भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. या भेटीनंतर त्यांनी महापालिका प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती.

या भेटी दरम्यान प्रशांत दामले यांनी प्रेक्षागृहातील रंगमंच, ग्रीन रूम (कलाकार कक्ष), आसनव्यवस्था आणि ध्वनीव्यवस्थेची बारकाईने पाहणी केली. कलाकारांच्या गरजा आणि प्रेक्षकांच्या सोयी लक्षात घेऊन नाट्यगृहात आवश्यक ते तांत्रिक बदल आणि सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. विशेषतः बॅकस्टेज आणि वातानुकूलित यंत्रणेबाबत त्यांनी चर्चा केली.

स्थानिक कलाकारांना वाव मिळावा आणि दर्जेदार नाटकांचे प्रयोग नांदेडमध्ये नियमितपणे व्हावेत, यासाठी नाट्यगृहाची देखभाल उत्तम राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नमूद यावेळी महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचे स्वागत केले आणि सुचवलेल्या सुधारणांची दखल घेऊन कामाला गती देण्याचे आश्वासन दिले. या नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत हा हेतु असल्याचे यावेळी पालिका

आयुक्तांनी सांगितले. या भेटीमुळे आगामी काळात नांदेडमध्ये दर्जेदार मराठी नाटकांची रेलचेल वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, क्रिडा अधिकारी व सांस्कृतिक अधिकारी रमेश चवरे, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, कार्यालय अधिक्षक पुरषोत्तम कामतगीकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande