
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील असदपूर-निंभारी परिसरातील सापन नदीपात्रात २४ वर्षीय युवक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. रोहित तेजू परते (रा. काकड सावन मेंढा, मध्य प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे. रोहित हा निंभारी येथील वीटभट्टीवर काम करण्यासाठी आला होता. गुरुवारी दुपारी चंद्रभागा बॅरेजच्या बॅकवॉटरमध्ये आंघोळीसाठी गेल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाल्याची माहिती समोर आली. दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जिल्हा शोध व बचाव पथकाने युवकाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. मात्र अंधार वाढल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले असून उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी