
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)।
जुन्या नांदेडमधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्यावर ३ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेले शिवकालीन अस्सल सुवर्ण होन, प्राचीन नाणी तसेच पुरातन शस्त्रे आणि आयुधे यांचे आगळेवेगळे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सांगली येथील भूमिपुत्र आणि नांदेडचेअपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या संकल्पनेतून, नंदगिरी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी किल्लेदारांची मोठी फौज तयार झाली आहे. नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रदर्शन कार्यक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा दुर्मिळ ठेवा सर्वसामान्यांना पाहता यावा आणि शिवकालीन इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
राज्याभिषेकाच्या वेळी प्रचलित केलेल्या सुवर्ण होन या नाण्यांपैकी एक अस्सल सुवर्ण होन प्रथमच नंदगिरी किल्ल्यावर पाहायला मिळणार आहे.
हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा अशोकसिंघ ठाकूर यांच्या संग्रहातून शुक्रवारी ३ एप्रिलला प्रदर्शित केला जाणार असून, किल्ल्यावर अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच भरत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय निलंगा (लातूर) येथील चक्रधर संग्रहालयाकडील इसवी सनपूर्व ६०० पासूनची दुर्मिळ नाणी शनिवारी, (ता. ४ एप्रिल) प्रदर्शित केली जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांची छायाचित्रे नागरिकांना पाहता येणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून नंदगिरी किल्ल्यावर अशा स्वरूपाचे प्रदर्शन भरवले जात असून, यंदा प्रथमच सुवर्ण होनाचा समावेश करण्यात आला आहे. या अनोख्या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड आणि किल्लेदारांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis