
बीड, 28 मार्च (हिं.स.)।
परळी येथील बस स्थानकावर एका अज्ञात महिलेने आपल्या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ही घटना घडली असून, याप्रकरणी परळीच्या संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील 'आशा शिशुगृह'चे अधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन महिला बसची वाट पाहत असताना एका तोंडाला रुमाल बांधलेल्या अनोळखी महिलेने 'बाथरूमला जाऊन येते' असे सांगून आपली मुलगी त्यांच्याकडे सोपवली आणि ती तिथून कायमची पसार झाली. बराच शोध घेऊनही ती महिला न सापडल्याने त्या महिलांनी मुलीला परभणीतील शिशुगृहात दाखल केले. सध्या ही बालिका बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार सुरक्षित असून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ९३ अन्वये अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis