
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। लोहा तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरताच शहरासह परिसरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे दुचाकींसह चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अफवेमुळे घाबरलेल्या नागरिकांनी आवश्यकतेपेक्षा अधिक इंधन भरण्याचा प्रयत्न केल्याने पंपांवर ताण वाढला.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंप चालकांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. काही ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीत इंधन वितरण सुरळीत सुरू ठेवण्यात आले. दरम्यान, पेट्रोल-डिझेलप्रमाणेच घरगुती गॅससाठीही रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना काळातील निर्बंध व नोटबंदीच्या काळातील परिस्थितीची आठवण झाली. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. इंधनाचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अनावश्यक साठेबाजी टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, अफवेमुळे निर्माण झालेल्या या गोंधळामुळे लोहा शहरातील दैनंदिन जीवनावर काही काळ परिणाम झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis