शेतकरी, बीपीएलधारकांना मिळणार तीन लिटर रॉकेल
बीड, 28 मार्च (हिं.स.)। सरकारने रेशन दुकानांमधून रॉकेल पुरवठ्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यासाठी १ लाख २० हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर करण्यात आला असून, पुरवठा विभागाकडून वितरणाचे नियोजन सुरू आहे. ६० रुपये प्रति लिटर दराने हे रॉ
शेतकरी, बीपीएलधारकांना मिळणार तीन लिटर रॉकेल


बीड, 28 मार्च (हिं.स.)।

सरकारने रेशन

दुकानांमधून रॉकेल पुरवठ्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यासाठी १ लाख २० हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर करण्यात आला असून, पुरवठा विभागाकडून वितरणाचे नियोजन सुरू आहे. ६० रुपये प्रति लिटर दराने हे रॉकेल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जिल्ह्यात एकूण पाच लाख रेशन कार्डधारक असले तरी, सध्या हे रॉकेल केवळ ग्रामीण भागातील प्राधान्यक्रम योजनेतील शेतकरी आणि दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. प्रति कुटुंब ३ लिटर रॉकेल दिले जाईल. १ मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद असून घरगुती गॅसचा पुरवठाही निम्म्यावर आल्याने इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकारने पुन्हा रॉकेलची मदत घेण्याचे ठरवले आहे. जिल्ह्यातील सुमारे ४० हजार गरजू कुटुंबांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

उपलब्ध होणारे रॉकेल ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी रेशन दुकानदार आणि पुरवठादारांच्या बैठका घेतल्या जात आहेत. लवकरच प्रत्यक्ष वितरण प्रक्रिया सुरू केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande