
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। हदगाव तालुक्यातील हरडफ येथील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला पारंपारिक पांदण रस्ता खुला करण्यासाठी आज प्रशासनाचे उंबरठे झिजवत हदगावच्या तहसीलदारांना लेखी निवेदन दिले. 'कुकड्याची पांदण' म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी आणि शेतीची कामे करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हरडफ येथील पोचीमाय मंदिरापासून सुरू होणारा हा पारंपारिक पांदण रस्ता आहे. पूर्वी या रस्त्याचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत असत. मात्र, सध्या हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आपली शेती वहिती करण्यासाठी, गुरेढोरे ने-आण करण्यासाठी आणि शेतीपयोगी साहित्य पोहोचवण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही.
निवदनात नमूद केल्यानुसार, ट्रॅक्टर, बैलगाडी आणि हार्वेस्टर
यांसारखी मोठी यंत्रणा शेतात नेण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी शेजारील शेतकऱ्यांच्या पाया पडावे लागते. दुसऱ्याच्या शेतातून रस्ता मागताना अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. विशेषतः सोयाबीन, ऊस, हरभरा यांसारख्या पिकांची पेरणी आणि कापणीच्या वेळी यंत्रे नेण्यासाठी मोठी अडचण येत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे.हा आमचा हक्काचा आणि पारंपारिक रस्ता आहे. रस्ता बंद असल्याने आम्हाला शेती करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हा पांदण रस्ता खुला करून द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र पाऊल उचलावे लागेल, अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.आता यावर तहसील प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना कधीपर्यंत न्याय मिळतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis