११ लाख ८५ हजारांचा अपहार, नांदगावच्या बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील प्रकार
अमरावती, 28 मार्च (हिं.स.) नांदगाव खंडेश्वरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी मागासवर्गीय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत येथे ११ लाख ८५ हजार रुपयांचा आर्थिक अपहार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. याप्रकरणात नांदगावखंडेश्वर पोलि
११ लाख ८५ हजारांचा अपहार, नांदगावच्या बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील प्रकार


अमरावती, 28 मार्च (हिं.स.)

नांदगाव खंडेश्वरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी मागासवर्गीय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत येथे ११ लाख ८५ हजार रुपयांचा आर्थिक अपहार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. याप्रकरणात नांदगावखंडेश्वर पोलिसांनी संशयित राजेंद्र वसंतराव बहीरुवाले (वय ५४) उपलेखा परीक्षक सहकारी संस्था, चांदुररेल्वे यांच्या तक्रारीवरून संशयित पुरुषोत्तम रामदास काळे सह एक महिला अशा दोघांविरुद्ध फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. उपलेखा परीक्षक राजेंद्र बहीरुवाले यांनी सदर सहकारी संस्थेचे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील लेखा परीक्षण केले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी मागासवर्गीय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाचे आर्थिक व्यवहाराचे दस्तऐवज तपासण्यात आले असता अनेक अनियमीतता पुढे आली. संस्थेचे सभासद व ठेवीदार भीमराव गुलाबराव कटकतलवारे यांच्या वतीने नांदगावखंडेश्वर येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यात या पतसंस्थेमध्ये एकूण ११ लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी सदर रकमेवरील व्याज व मुदत ठेव परत मागितली असता, संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली. दोघांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मृत भीमराव गुलाबराव कटकतलवारे यांच्या मुदतठेवीच्या रकमेचा अपहार करून त्यांची फसवणूक केली. असा ठपका, उपलेखा परीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात ठेवला आहे. त्याआधारे पोलिसांनी संशयित पुरुषोत्तम काळे व एक महिला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande