
लातूर, देवणी, निलंगा, वलांडीसह ग्रामीण भागातील चित्र
लातूर, 28 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्ह्यासह देवणी, निलंगा, वलांडी आणि इतर ग्रामीण भागांमध्येही इंधन टंचाई होणार असल्याच्या अफवांनी अचानक जोर धरला असून नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या अफवांमुळे शहरांसह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवरही वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी
गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्येइंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली असून खुल्या स्वरूपातील विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. काही भागात दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २०० रुपये, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी २,००० रुपयांपर्यंतच इंधन देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता अनेक पेट्रोलपंपांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांना दिलासा देत स्पष्ट केले आहे की, पेट्रोल व डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोणतीही टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक साठवणूक टाळावी,असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, चुकीच्या माहितीमुळे निर्माण होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी संयम राखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis