
- प्रदेशाध्यक्ष गुड्डी नायक तर संघटन मंत्रीपदी आम्रपाली चौधरी
अमरावती, 28 मार्च (हिं.स.)।
येथील भव्य हिंदू संमेलनाच्या साक्षीने भगवा पार्टीने आपल्या संघटनेचा विस्तार करत अमरावतीच्या भूमीतून मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाकांत शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली, गुड्डी नायक (रेखा) यांची किन्नर आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी, तर आम्रपाली चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सुरेंद्र शुक्ल आणि अमर शहीद वंशजांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या नियुक्तीमुळे केवळ अमरावतीतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील किन्नर समाजात आनंदाची जोरदार लाट उसळली असून, पक्षाची ही नवी फळी आता सक्रिय राजकारणात ताकदीने उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री राजेश राऊत, नवनियुक्त प्रदेश सचिव, मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार भार्गव, तसेच डॉ. अनिल दवंडे, अजय सिंह ठाकूर, प्रकाश दिवे, संदीप बाजड आणि मोठ्या संख्येने किन्नर बांधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे बहाल करण्यात आली.
यावेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट केले की, समाजात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. गुड्डी नायक आणि आम्रपाली चौधरी यांच्या निवडीमुळे पक्षाची पाळेमुळे गावखेड्यापर्यंत घट्ट होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, या नियुक्तीनंतर आता राजकारणाच्या मुख्य प्रवाहात किन्नर समाज मोठ्या संख्येने सहभागी होत असून, आगामी काळात ही वज्रमूठ अधिक मजबूत होताना दिसेल.
सत्तेत आता समान वाटा
भगवा पार्टीने (भारतीय गण वार्ता पार्टी) घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे. गुड्डी नायक आणि आम्रपाली चौधरी यांच्या खांद्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवून पक्षाने सर्वसमावेशक राजकारणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत पक्षाची प्रतिमा अधिक उजळली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी