
नांदेड, 28 मार्च (हिं.स.)। शहरातील जुना कौठा परिसरातील कमलनगर व इतर वस्त्यांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी स्वतःचा उदो उदो करण्याऐवजी पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कमलनगर व आसपासच्या भागात पूर्वी दर दोन दिवसाआड सकाळी सुमारे ६.३० वाजता मुबलक पाणीपुरवठा केला जात होता. मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली असून पाणी अनियमित वेळेत व अपुऱ्या प्रमाणात येत आहे. परिणामी नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एका बाजूला पाण्याची कमतरता दुसरीकडे नासाडी
विशेष म्हणजे, कमलनगर वस्तीपासून अल्प अंतरावर गोदावरी नदी वाहत असतानाही पाण्याची टंचाई भासत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याउलट, मुख्य रस्त्यालगतच्या काही वस्त्यांमध्ये पहाटे ५.३० वाजल्यापासून नळाचे पाणी नाल्यात वाहून जात असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. एका बाजूला पाण्याची कमतरता आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची नासाडी, या विसंगतीमुळे संताप व्यक्त होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis