
ठाणे , २८ मार्च, (हिं.स) जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे सध्या एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या इंधनाची गरज ओळखून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 25मार्च 2026 रोजी काढलेल्या आदेशानुसार, राज्यात तात्पुरत्या स्वरूपात केरोसीनचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
*1. केरोसीन वाटपाचे स्वरूप आणि प्रमाण*
केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 3 हजार 744 कि.ली. (37 लाख,44 हजार लिटर) केरोसीनचा कोटा मंजूर केला आहे.
*या वाटपाचे मुख्य नियम खालीलप्रमाणे आहेत.*
• प्रति कुटुंब मर्यादा : प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकास किंवा कुटुंबाला 3 लिटर केरोसीन दिले जाईल.
• वितरण कालावधी : हे वितरण प्रामुख्याने मार्च 2026 मध्ये केले जाणार आहे.
• उचल बंधनकारक : वाटपाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत संपूर्ण केरोसीनची उचल करणे आवश्यक आहे, अन्यथा ते पुढे हस्तांतरित (Carry forward) केले जाणार नाही.
*2.लाभार्थी आणि प्राधान्यक्रम केरोसीन वितरणासाठी शासनाने स्पष्ट नियमावली जाहीर केली आहे:*
• प्रथम प्राधान्य : अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिकाधारकांना वितरणात अग्रक्रम दिला जाईल.
• इतर पात्र घटक : केरोसीन उपलब्ध असल्यास श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेली कुटुंबे (ग्रामपंचायत रहिवासी दाखला आवश्यक) आणि स्थलांतरित मजूर (शासकीय ओळखपत्र आवश्यक) यांनाही वितरण केले जाऊ शकते.
*3. जिल्हावार वाटप आणि व्यवस्थापन*
राज्यातील विविध जिल्ह्यांच्या मागणीनुसार केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे. काही प्रमुख जिल्ह्यांचे वाटप खालीलप्रमाणे आहे.
नाशिक : 228 कि.ली. (सर्वाधिक)
अहिल्यानगर : 216 कि.ली.
पुणे ग्रामीण : 204 कि.ली.
जळगाव,कोल्हापूर,नांदेड : प्रत्येकी 156 कि.ली.
ठाणे : 48 कि.ली.
*तेल कंपन्यांचा सहभाग :*
हे वाटप IOCL (1 हजार 584 कि.ली.), BPCL (1 हजार 8 कि.ली.) आणि HPCL (1 हजार 152 कि.ली.) या तीन मुख्य कंपन्यांमार्फत केले जाईल.
*4. वितरण प्रक्रिया आणि खबरदारी*
हे वितरण पारदर्शक व्हावे यासाठी शासनाने कडक सूचना दिल्या आहेत:
• नोंदणी : रास्त भाव दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांनी वितरणाच्या नोंदी ऑफलाईन (भौतिक नोंदवहीमध्ये) अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे.
• दर : केरोसीनच्या दराबाबत आणि विक्रेत्यांच्या कमिशनबाबत शासन स्वतंत्र आदेश लवकरच निर्गमित करणार आहे.
• भेसळ रोखण्यासाठी उपाय : पेट्रोल किंवा डिझेलमध्ये केरोसीनची भेसळ होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे 'संयुक्त निरीक्षण पथक' तैनात करण्यात येणार आहे.
हे केरोसीन वाटप तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मागणी आणि प्रतिसादानुसार यामध्ये भविष्यात बदल केले जाऊ शकतात.
एलपीजीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या ग्रामीण आणि गरजू कुटुंबांसाठी हा निर्णय मोठा आधार ठरणार आहे. विशेषतः ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही किंवा जे स्थलांतरित आहेत, त्यांना 3 लिटर केरोसीन उपलब्ध करून देऊन शासनाने एक प्रभावी पर्यायी व्यवस्था उभी केली आहे.
*ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब 3 लिटरचा कोटा निश्चित..*
केंद्र सरकारच्या 12 मार्च 2026 च्या आदेशानुसार, एलपीजीला तात्पुरता पर्याय म्हणून केरोसीनचे (घासलेट) वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.या निर्णयांतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 37 लक्ष 44 हजार लिटर ( 3 हजार 744 KL) केरोसीनचा साठा मंजूर करण्यात आला असून, त्यातील 48,000 लिटरचा (48 KL) वाटा रायगड जिल्ह्याला मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या 48 किलो लिटर साठ्याच्या वाहतुकीसाठी एकूण 4 टँकरला परवानगी देण्यात आली आहे. मार्च आणि एप्रिल 2026 या महिन्यांसाठी तालुकानिहाय मागणीनुसार हे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, केरोसीनच्या विक्री दराबाबतचे स्वतंत्र आदेश शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.
या संदर्भातील अधिक माहितीसाठी नागरिक आपल्या जवळच्या रास्त भाव दुकानात किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधू शकतात.
मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
ठाणे / रायगड
तथा
प्र.उपसंचालक,
विभागीय माहिती कार्यालय,
कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर